लग्नासाठी हत्येतील एका मुख्य आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाने पॅरोल मंजूर केल्याची घटना समोर आली आहे. कैद्याला न्यायालयाने १५ दिवसांचा पॅरोल दिला आहे. एखाद्या दोषी व्यक्तीला लग्नासाठी पॅरोल मंजूर करण्याचे हे अत्यंत एकमेव प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. या गुन्हेगाराच्या आईने आणि त्याच्या प्रेयसीने पॅरोलसाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. प्रयेसीसीचे दुसऱ्याशी लग्न होईल, त्यामुळे आनंदला पॅरोल देण्यात यावा, जेणेकरून तो तिच्याशी लग्न करू शकेल, असे याचिकेत म्हटले होते. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी ही एक असाधारण परिस्थिती मानली, त्यांनी आरोपी आनंद याला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर केला.
सरकारी वकिलांनी पॅरोलला विरोध करत म्हटले की, “लग्नासाठी पॅरोल देण्याची तरतूद नाही.” जर हा विवाह अन्य कोणाचा असता ज्यामध्ये अटकेत असलेल्या व्यक्तीला हजर राहायचे असते, तर परिस्थिती वेगळी असती, असं वकिलांनी म्हटले. यावर न्यायालयाने म्हणाले की, 'अतिरिक्त सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीला जेल नियमांच्या कलम 636 अंतर्गत पॅरोलचा अधिकार मिळू शकत नाही. तुरुंग नियमावलीच्या कलम 636 मधील उपकलम 12 संस्थेच्या प्रमुखाला इतर कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार देते. म्हणूनच न्यायालयाने ही एक विलक्षण परिस्थिती मानून त्या व्यक्तीला पॅरोल मंजूर केला.
कर्नाटकात आनंद नावाच्या तरुणाला एका खुनाच्या प्रकरणात न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो बंगळुरू सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. आनंदची आई रत्नम्मा आणि त्याची प्रेयसी नीता यांनी नुकतीच कर्नाटक उच्च न्यायालयात तातडीच्या पॅरोलसाठी याचिका दाखल केली होती.
नीता यांनी याचिकेत म्हटले होते की, ती दुसऱ्याशी लग्न करणार आहे, त्यामुळे आनंदला तिच्याशी लग्न करण्यासाठी पॅरोल देण्यात यावा. गेल्या नऊ वर्षांपासून ती आनंदवर प्रेम करत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले असून, लग्न करण्यासाठी त्याला पॅरोलवर सोडण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. यावेळी आरोपीच्या आई रत्नम्मा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तिचे दोन्ही मुलगे तुरुंगात आहेत. मी वृद्ध असून अनेक आजारांनी त्रस्त आहे. आनंदने नीताशी लग्न करावे अशी माची इच्छा आहे, असं या याचिकेत म्हटले आहे.
न्यायालयाने तुरुंग उपमहानिरीक्षक आणि मुख्य पोलीस अधीक्षक, परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृह यांना "अर्जदाराच्या अपीलवर विचार करण्याचे आणि आनंदला ५ एप्रिल २०२३ च्या दुपारपासून २० एप्रिल २०२३ च्या संध्याकाळपर्यंत पॅरोलवर सोडण्याचे निर्देश दिले आहेत.