ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि 13 - एका 70 वर्षांच्या आजोबांना विवाहबाह्य संबंध चांगलेच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. या 70 वर्षांच्या आजोबांना त्यांच्या गर्लफ्रेंडने ब्लॅकमेलं केलं अशून दोघांचे अतरंगी फोटो आणि व्हिडीओ कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिली आहे. इतकंच नाही तर सात लाख रुपयांची मागणी केली असून, न दिल्यास हे फोटो आणि व्हिडीओ कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याची धमकीही दिली आहे. शेवटी तिच्या धमक्यांना कंटाळून पीडित वयोवृद्धाने पोलिसांकडे धाव घेतली.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
70 वर्षांचे आनंद पटेल (बदललेले नाव) व्यवसायाने व्यापारी असून घटलोडिया येथे राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख एका महिलेसोबत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन मेसेज आला. मेसेज पाठवणा-या महिलेने तिचे नाव सोनिया असून थलतेज येथे राहत असल्याचं सांगितलं. आनंद पटेल यांनी कोणतीही शहानिशा न करता या मेसेजला रिप्लाय केला.
आपला पती दुबईत काम करत असून आपण एकटे राहत असल्याचं सांगत या महिलेने आनंद पटेल यांच्याकडे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. एकमेकांना मेसेज करण्याचे प्रमाण वाढले. पत्नी, मुलगा आणि भाच्यासोबत राहणा-या पटले यांचे एसजी महामार्गावरील न्यू यॉर्क टॉवरमध्ये कार्यालय आहे. रविवारी सकाळी हे दोघं न्यू यॉर्क टॉवरमधील कार्यालयात भेटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध निर्माण झाले होते, मात्र ते शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले नव्हते. रविवारी संध्याकाळी दोघेही एकत्र होते. यानंतर सोमवारी सोनियाने पटेल यांना दोघांचे फोटो त्यांच्या पत्नी आणि मुलाला पाठवण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला. यानंतर, कुटुंबीयांना फोटो पाठवू नये, असे वाटत असल्यास तर 7 लाख रुपये द्या, अशी मागणी तिने केली.
अखेर तिच्या धमक्यांना घाबरलेल्या पटेल यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून त्यांच्याकडे मदत मागितली. पोलीस आयुक्तांनी तक्रार नोंदवून चौकशीचे आदेश दिले आहेत. तक्रार केल्यानंतर महिला फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. कॉल रेकॉर्ड्सच्या सहाय्याने पोलीस फरार महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या प्रकरणामागे मोठी टोळी सक्रीय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.