नवी दिल्ली - महिलांसोबत गैरवर्तन केल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अनेकदा महिला अशा मंडळींना चांगलाच धडा शिकवतात. त्यांची यथेच्छ धुलाई करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील उरईमध्ये एका काँग्रेस नेत्याला दोन तरुणींनी भररस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. अनुज मिश्रा असं या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचं नाव असून दोन तरुणींनी स्टेशन रोडवर त्याला मारहाण केली आहे.
सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत. तरुणींनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर फोनवरुन अश्लील संभाषण केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी रेल्वेस्टेशन जवळ ही घटना घडली. अनुज मिश्रा हा तरुणींना फोन करून अश्लील भाषेत बोलत होता असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच फोनवर अश्लील भाषेत बोलण्याशिवाय हा व्यक्ती त्यांना एकांतात भेटण्यासही सांगत होता असं देखील तरुणींनी म्हटलं आहे.
संतप्त झालेल्या तरुणींनी भर रस्त्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षाला अक्षरश: चपलेने मारहाण केली आहे. व्हिडीओमध्ये अनुज मिश्रा हे कधी हात जोडून तर कधी तरुणींचे पाय धरून माफी मागत असल्याचं पाहायला मिळत आहे. तरुणींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याकडे देखील मिश्रा यांची तक्रार केली होती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही व याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच अनुज मिश्रा याने प्रियंका गांधींसोबतचा एक फोटो शेअर केला होता.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी प्रियंका गांधींवरही निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मीडिया सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी ट्विट करूत प्रियंका गांधींवर हल्लाबोल केला आहे. "हाथरसपासून जालौन काही तासांच्या अंतरावर आहे. प्रियंका गांधीजी महिला आणि मुलींसोबत अशारितीने छेडछाड करणं कधी बंद केलं जाईल हे आपल्या जिल्हाध्यक्षाला विचारण्यासाठी या" असं मृत्यूंजय कुमार यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.