नवी दिल्ली/मुंबई : नागरी सेवा परीक्षांमध्ये सर्वोच्च यश मिळविणाऱ्यांमध्ये मुलींचा दबदबा यंदाही कायम राहिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांमध्ये संपूर्ण देशातून श्रुती शर्मा हिने पहिला क्रमांक पटकाविला आहे. या परीक्षेत अंकिता अग्रवाल व गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळविला. ऐश्वर्या वर्मा ही चौथ्या, तर उत्कर्ष द्विवेदी पाचव्या स्थानी आहे; तर मुंबईची प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही देशात १३ वा क्रमांक मिळवित राज्यात पहिली आली असून, सोलापूरचा अनय नावंदर हा देशात ३२ वा क्रमांक मिळवित राज्यात दुसरा आला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातून आहेत. देशभरातून उत्तीर्ण झालेल्या ६८५ उमेदवारांपैकी २४४ जण खुल्या गटातील, ७३ जण आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील, २०३ जण अन्य मागासवर्गीय, तर १०५ जण अनुसूचित जाती व ६० जण अनुसूचित जमाती या गटातील आहेत. लेखी परीक्षा यंदाच्या जानेवारी महिन्यात घेण्यात आली, तर उमेदवारांच्या मुलाखती एप्रिल व मे महिन्यांमध्ये घेण्यात आल्या हाेत्या.
वर्तमानपत्रातून काढल्या नोट्स
दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या बातम्यांमधून नोट्स काढण्याचा फायदा मला यूपीएससीची परीक्षा देताना झाला, असे यंदाच्या नागरी सेवा परीक्षांमध्ये देशात अव्वल ठरलेल्या श्रुती शर्मा हिने सांगितले. दिल्लीची रहिवासी आणि जेएनयूची माजी विद्यार्थिनी असलेली श्रुती आपल्या यशाचे गमक सांगताना म्हणाली की, नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्यासाठी मी वर्तमानपत्रांच्या वाचनावर भर दिला. वर्तमानपत्रांमधून नोट्स काढून आपली उत्तरे अधिकाधिक आकर्षक कशी करता येतील, याची तयारी केली. सोशल मीडियाचा अतिशय मर्यादित वापर केल्याचे सांगत श्रुतीने आपल्या यशाचे श्रेय पालक आणि मित्रपरिवारालाही दिले. गेल्या चार वर्षांपासून ती नागरी सेवा परीक्षांची तयारी करीत होती.