श्रीगंगानगर (राजस्थान) : मुलगी जन्माला आली की तिचे वेगवेगळ््या रितीने स्वागत केले जाते. राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांत मुलीचा जन्म झाला की वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून पाच हजार रोपांची लागवड झाली. ही वृक्षारोपणाची मोहीम गेल्या डिसेंबरमध्ये सुरू झाली. या मोहिमेत नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या आई-वडिलांच्या हस्ते झाडांची पाच रोपे लावली जातात. जिल्हा प्रशासन ही रोपे त्यांना उपलब्ध करून देते. या रोपांची काळजी व निगा ही कामे जिल्हा प्रशासन व मुलीचे पालक, असे दोघेही बघतात. या मोहिमेचा दुहेरी उद्देश आहे. एक म्हणजे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे व पर्यावरणाचे संरक्षण. श्रीगंगानगर जिल्ह्यात आज एक हजार मुलांमागे ८५४ मुली, असे प्रमाण आहे आणि ही मोहीम समाजात योग्य तो संदेश देण्याचे काम निश्चित करील अशी आशा जिल्हाधिकारी ग्यानराम यांनी व्यक्त केली. आम्ही अशा अनेक जागा (सरकारी इमारती, रस्त्याच्या कडेच्या जागा) शोधल्या की जेथे रोपे लावून त्यांची जोपासना करता येईल, असे ग्यानराम म्हणाले. दोन महिन्यांत पाच हजार रोपांची लागवड झाली असून वर्षभरात ५० हजार रोपे लावली जातील. लावलेली रोपे जगतील, वाढतील व अंतिमत: या मोहिमद्वारे चांगला संदेश जाईल यासाठी मुलीचे पालक, कुटुंबीय व जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे, असे ग्यानराम म्हणाले.
मुलीच्या जन्माचे स्वागत होतेय वृक्षारोपण करून
By admin | Published: February 20, 2017 1:06 AM