ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - मुस्लिम असूनही एपीजे अब्दुल कलाम हे खरे राष्ट्रभक्त होते, या वादग्रस्त वक्तव्याला काही काळ लोटतो न लोटतो तोच महेश शर्मा यांनी मुलींच्या नाईट आऊटवरून आणखी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'मुलींनी रात्री बाहेर राहणं (नाईट आऊट) हे आपल्या संस्कृतीत बसत नाही आणि भारतात ते स्वीकारलं जाणार नाही' असे सांगत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शर्मा यांनी आणखी एका वादाला तोंड फोडलं आहे. 'इतर देशांमध्ये मुलींनी रात्री घराबाहेर राहणं स्वीकारलं जात असेलही पण आपल्या संस्कृतीत हे चालत नाही' असे विधान शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान केले आहे.
शर्मा यांनी यापूर्वीही अशी अनेक मुक्ताफळे उधळली आहेत. दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिम असून एक महान राष्ट्रभक्त आणि मानवतावादी व्यक्ती होते होते असे त्यांनी म्हटले होते. तर कुराण व बायबलमध्ये भारताचा आत्मा नाही. रामायण, महाभारत व गीता हे देशातील प्रत्येक शाळेत बंधनकारक करायला हवे असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी गेल्याच आठवड्यात केले होते. शर्मांच्या विधानांवर सोशल मीडियासह चहुबाजूंनी टीका होत असतानाही त्यांनी मुक्ताफळे उधळणं सुरूच ठेवले आहे.