हरयाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी एका जनजागृती कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि सोशल मीडियात चर्चेला सुरुवात झाली. प्रेमाच्या नावाखाली वाढत्या शारीरिक शोषणाच्या घटनांबद्दल बोलताना त्यांनी मुलींनाच कडक शब्दात सुनावले. ‘मुली ओयो रूम्समध्ये हनुमानाची आरती करायला जात नाहीत. अशा ठिकाणी चुकीचे घडू शकते हे ध्यानात ठेवले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
कैथल येथील एका कॉलेजमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी, शारीरिक शोषणाच्या अनेक घटना लिव्ह-इन रिलेशनशिपमधील असतात. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनलेल्या लिव्ह-इन कायद्यामुळे आमचे हात बांधले गेले आहेत. या कायद्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, गुन्हे कमी होण्याऐवजी वाढत आहेत. कायद्याचे पुनरावलोकन करून बदल करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
महिलांवरील वाढत्या शारीरिक शोषणाच्या घटनांबाबत बोलताना, त्याने पेयात काहीतरी मिसळून प्यायला लावले, नंतर शारीरिक अत्याचार केला, अशी तक्रार मुली करतात. ही स्वाभाविक गोष्ट झाली आहे. पण, जेव्हा ओयो रूम्स सारख्या ठिकाणी जातो तेव्हा तिथे हनुमानाची आरती तर करणार नाही हे काय मुलींना माहिती नसते का? अशा ठिकाणी वाईट प्रसंग घडू शकतो हे समजायला हवे. मुली बाकी सगळ्याच बाबतीत एवढ्या समजदार असतात, मग या बाबतीत का नाही? असे त्या म्हणाल्या. कॉलेजला जायला लागताच मुला-मुलींना पंख फुटतात, असेही त्यांनी पुढे नमूद केले.