नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. एका तरूणीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराची गळ्यावर चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकित सक्सेना असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव असून तो फोटोग्राफर होता. मुलीच्या वडिलांनी अंकितला अडवून भरचौकात त्याची हत्या केली.
याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, काका व आईला अटक केली आहे. 23 वर्षीय अंकितचे 20 वर्षीय तरूणीशी प्रेमसंबंध होते. पण ती तरूण दुसऱ्या समाजाची होती. मी अंकितची टागोर गार्डन मेट्रो स्टेशनवर वाट पाहत होती. तो त्याची बाईक आणायला घरी गेला होते. तेथे असताना अंकितची हत्या माझ्या वडील व काकांनी केल्याचं मला समजलं, असं तरूणीने पोलिसांना सांगितलं आहे.
गुरूवारी संध्याकाळी पश्चिम दिल्लीच्या रघुवीर नगरमध्ये ही घटना घडली. अंकितच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी कामावरून परतत असताना मुलीच्या घरून फोन आला त्यावेळी ते अंकितच्या स्टुडिओमध्ये जात होते. काहीवेळाने शेजारचा मुलगा घरी आला व त्याने अंकितला चौकात काही लोक मारत असल्याचं सांगितलं. अंकितची आई तेथे पोहचल्यावर अंकितला मुलीचे वडील व काका लाथांनी मारत असल्याचं पाहिलं. मारहाणीत जखमी झालेला अंकित जमिनीवर पडला होता.
अंकितला फोटोग्राफ्रीची आवड होती. तो लग्न-समारंभात फोटोग्राफी करत करायचा. मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या आई-वडिलांनाही मारहाण केली आहे. मारहाणीत मुलाची आई गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अंकितला मारहाण होत असताना तो मुलीच्या वडिलांना व काकाला हात जोडून पोलीस स्टेशनमध्ये चलण्याची विनंती करत होता. हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलूया असं त्याचं म्हणणं होतं. पण मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच काहीही ऐकून न घेता त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. अंकितची नियोजन करूनच हत्या झाली, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. अंकितची हत्या करायची हे त्यांनी आधीच ठरवलं होतं, म्हणून ते चाकू बरोबर घेऊन आले होते. व अंकितला धक्के देत रस्त्याच्याकडेला जेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणी नेलं व त्याची हत्या केली, असा आरोप अंकितच्या कुटुंबीयांनी केला आहे.