अहमदाबाद : अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी देण्यास गुजरातउच्च न्यायालयाने नकार दिला. पूर्वी मुलींनी कमी वयात लग्न करणे आणि १७ वर्षांच्या आधी मुलाला जन्म देणे हे सामान्य होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना मनुस्मृती वाचण्याचाही सल्ला दिला.
न्यायमूर्ती समीर दवे यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान सांगितले की, मुलगी आणि गर्भ दोघेही निरोगी असतील, तर आपण गर्भपाताच्या याचिकेला परवानगी देऊ शकत नाही.
बलात्कार पीडितेचे वय १६ वर्षे ११ महिन्यांचे असून, तिच्या पोटात सात महिन्यांचा गर्भ आहे. गर्भपाताच्या परवानगीसाठी मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कारण गर्भधारणेच्या २४ आठवड्यांनंतर न्यायालयाच्या परवानगीनेच गर्भपात करता येतो.
मुलीचे कुटुंब चिंतेत...
वकिलाने लवकर सुनावणीची मागणी करीत मुलीच्या वयामुळे कुटुंब चिंतेत असल्याचे सांगितले. यावर न्यायमूर्ती दवे म्हणाले की, चिंतेची बाब आहे.तुमच्या आईला किंवा आजीला विचारा, त्यांची वयाच्या १४-१५ व्या वर्षी लग्न होत असे. तेव्हा मुली १७ वर्षांच्या होण्यापूर्वीच त्यांच्या पहिल्या अपत्याला जन्म देत असत. मुली मुलांच्या आधी प्रौढ होतात. त्यासाठी एकदा मनुस्मृती वाचा.