ठळक मुद्देघटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी या प्रकरणी चौकशीचे तसेच कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दिल्लीतील 'संस्कार आश्रम फॉर गर्ल्स' या आश्रमशाळेतील 9 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील 'संस्कार आश्रम फॉर गर्ल्स' या आश्रमशाळेतील 9 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी आश्रमातून मुली गायब झाल्याची माहिती मिळताच दिल्ली महिला आयोगाने उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना तातडीने याची माहिती दिली. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली असून मनिष सिसोदिया यांनी या प्रकरणी चौकशीचे तसेच कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
दिल्लीतील आश्रमशाळेतून मुली बेपत्ता झाल्यानंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दिल्ली सरकारने मुख्य सचिवांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या प्रतिनिधींना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना पत्र लिहून लवकरात लवकर बेपत्ता मुलींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. 1 डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडली. दिलशाद गार्डन परिसरातील संस्कार आश्रमातून 9 मुली बेपत्ता झाल्या. मात्र मुलीच्या बेपत्ता होण्याची कोणालाच माहिती नव्हती. 2 डिसेंबर रोजी मुली बेपत्ता झाल्याचं समोर आलं. याआधी बिहारमधील मुजफ्फरपूर आणि उत्तर प्रदेशातील देवरियातील आश्रमशाळेतूनही मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.