जयपूर - राजस्थानातील सरकारी महाविद्यालयांमध्ये पुढच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांसाठी फक्त शर्ट-पँट आणि मुलींसाठी सलवार-कुर्ता किंवा साडी असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. महाविद्यालयीन शिक्षण संचालनालयाने याबाबत काढलेल्या परिपत्रकाचा समाजाच्या विविध स्तरातून निषेध होत आहे. हा अपमानकारक निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली जात आहे.राजस्थान सरकारकडून एकूण २१९ महाविद्यालये चालविली जातात. यात चार लाख विद्यार्थी असून, मुलींची संख्या १ लाख ७५ हजार आहे. संचालनालयाने कॉलेजांना ४ एप्रिलला विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत परिपत्रक पाठवले. राजस्थानच्या उच्च शिक्षणमंत्री किरण माहेश्वरी म्हणाल्या की, बाहेरील मुलांना कॉलेज आवारात येण्यास अटकाव करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य असावा, अशी मागणी मुलांनीच केली होती.संघाचा अजेंडा राबवण्याचा आरोपपीपल्स युनियन फॉर सिविल लिबर्टीज् (पीयूसीएल) या संस्थेने, अशी गणवेशसक्ती लागू करण्याच्या निर्णयाला घटनाविरोधी, समाजाला मागे नेणारा, पुरुषसत्ताक आणि हुकूमशाही मानसिकतेचे दर्शन घडवणारा असे म्हटले आहे.पीयूसीएलच्या महासचिव कविता श्रीवास्तव म्हणाल्या की, सरकार परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याची हिंमत कशी करू शकते? आज मुली जीन्स, टी-शर्ट, पँट, स्कर्ट, घागरा आदी कपडे परिधान करतात. त्यांचे कपडे हा त्यांचा अधिकार आहे.
मुलींनी महाविद्यालयात केवळ सलवार-कुर्ता वा साडीत यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 1:44 AM