चेन्नई, दि. 23- एका 24 वर्षीय तरूणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. विरुगंबक्कम भागात सोमवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही तरूणी इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने ती सुदैवाने बजावली. इमारतीवरून पडल्याने तिच्या पाठीला दुखापत झाली पण या आत्महत्येच्या प्रयत्नात तिचा जीव वाचला आहे. या तरूणीची प्रकृती गंभीर असल्याचंही समजतं आहे. या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. तसंच ब्लू व्हेल गेममुळे त्या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा संशय सध्या पोलिसांना येतो आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
ब्लू व्हेल गेममुळे याआधीही मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ब्लू व्हेल गेममध्ये अॅडमिनिस्ट्रेटरकडून खेळणाऱ्याला टास्क दिले जातात. साधारणतपणे 50 टास्कचा हा गेम असून खेळाच्या शेवटच्या टप्प्यात खेळणाऱ्याला आत्महत्या करायचं आव्हान दिलं जातं. या आव्हानामुळे मुलं आत्महत्येचं पाऊल उचलतात.
आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरूणी काही दिवसांपासून तणावात दिसत होती. कदाचित ती ब्लू व्हेल गेम खेळत असावी, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. शेजाऱ्यांच्या माहितीनंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. निवेदिता असं त्या मुलीचं नाव असून ती विरुगंबक्कम भागातील एका पॉश कॉम्पेक्समध्ये आई-वडिलांसह राहते. निवेदिताने अचानक ही कृती केली. बाल्कनिचं लोखंडी दार उघडून तिने उडी मारली, असं पोलिसांना काही साक्षीदारांनी सांगितलं आहे.
निवेदिता ब्लू व्हेल गेम खेळत होती का ? याबद्दल तिच्या पालकांना काहीही माहिती नाही. पण तिच्या फोनमधील कॉलरेकॉर्ड आम्ही तपासत असल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.तसंच निवेदिताच्या आत्महत्येच्या प्रयत्नाच्या इतर कारणांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.
व्हेल गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना दिले होते. इंटरनेट प्लॅटफॉर्मवरुन या गेमची किंवा त्यासंबंधित लिंक तातडीने हटवावी, असं पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या इंटरनेट कंपन्यांना पाठवलं. गुगल, फेसबूक, व्हॉट्सअॅप, याहू यासारख्या वेबसाइट्सना ब्ल्यू व्हेल गेमबाबतच्या सर्व लिंक काढून टाकण्यास केंद्र सरकारने सांगितलं होतं.