इस्लामाबाद : मूकबधिर भारतीय तरुणी गीता (२३) हिचा ती अल्पवयीन असताना विवाह झाला होता व तिला १२ वर्षांचा मुलगा असल्याच्या भारतात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा स्वत: गीताने इन्कार केला आहे.वृत्तात गीताचे मूळ गाव बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील असून, गावातील रहिवाशांचा हवाला देऊन तिचा उमेश माहतो याच्याशी विवाह झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर समाजसेवक अब्दुल सत्तार इधी यांचा मुलगा फैसल इधी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही गीताशी या विषयावर बोललो आहोत. भारतीय उच्चायुक्तालयाने पाठविलेल्या गीताच्या कुटुंबियांच्या छायाचित्रातील सदस्यांना तिने ओळखले व त्यांच्याशी तिने इंटरनेटद्वारे संभाषण करण्याच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांनी तिला सांगितले की, तुझा विवाह झाला आहे व तिने मात्र त्याचा स्पष्ट इन्कार केला. भारतात प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील छायाचित्रातील मुलगी गीता असल्याचा त्यांचा दावा असून, ते छायाचित्र आम्ही तिला दाखविल्यावर ती मुलगी मी नाही, असेही गीता म्हणाल्याचे फैसल इधी म्हणाले. २६ आॅक्टोबर रोजी गीताला नवी दिल्लीला पाठविण्याची तयारी होत असताना परिस्थिती काहीशी गुंतागुंतीची झाली आहे. ती आमच्यापासून काही लपवून ठेवत आहे का, की आमची काही दिशाभूल करीत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही तिच्याशी बोलत आहोत, असे त्यांनी म्हटले. भारतीय उच्चायुक्तालयाने इधी फाऊंडेशनला गीताच्या कुटुंबियांचे छायाचित्र पाठविल्यावर तिने त्यांना ओळखल्यावर तिला मायदेशी आणण्याची तयारी सुरू केली आहे.
गीता म्हणते, माझा कधीही विवाह झाला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2015 10:28 PM