नवी दिल्ली : भूखंडाच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआयने मंगळवारी जवळपास पाच तास माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यांची चौकशी केली. रेल्वेत नोकऱ्या देण्यासाठी यादव कुटुंबाला किंवा त्यांच्या परिचितांना भूखंड दान देण्यात आले किंवा बाजारभावापेक्षा स्वस्तात त्याचा सौदा करण्यात आल्याचा आरोप आहे.
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूंच्या पत्नी राबडीदेवी यांची पाटणा येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी पाच तास चौकशी करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की लालूप्रसाद यादव, राबडीदेवी आणि इतर १४ जणांविरोधात गुन्हेगारी कटकारस्थान केल्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यांना १५ मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
केंद्र सरकार वडिलांचा छळ करतेय; लालूंच्या मुलीचा संतापपाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा केंद्र सरकार छळ करीत असल्याचा आरोप त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे. लालू प्रसाद यादव यांची सीबीआयकडून चौकशी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा आरोप केला आहे. दिल्लीतील जमीन आणि नोकरी प्रकरणामध्ये सीबीआयकडून लालूप्रसाद यांची चौकशी करण्यात येत आहे. ते रेल्वेमंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. ‘हे लोक वडिलांचा छळ करीत आहेत. यामुळे कुठली समस्या उद्भवल्यास आम्ही दिल्लीतील सत्तेला हलवून सोडू. आता संयम सुटत चालला आहे,’ असे ट्वीट रोहिणी यांनी केले आहे. लालूप्रसाद यांच्यावर ‘किडनी ट्रान्स्प्लांट’ झाले असून, गेल्या महिन्यात ते भारतात परत आले आहेत.
भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी का करू नये? बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या सीबीआय चौकशीबाबत जदयू आणि राजद यांनी केलेल्या टीकेवर पलटवार करताना भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची चौकशी करण्यात गैर काय आहे, असा प्रश्न भाजपने मंगळवारी उपस्थित केला.