चंबा (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशात कोणताही पक्ष सलग दोनदा सरकार स्थापन करू शकत नाही, अशी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा मोडून मतदारांनी पुन्हा एकदा भाजपला सत्तेत येण्याची संधी द्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केले.
बिक्रम सिंह जरयालांच्या समर्थनार्थ एका रॅलीला संबोधित करताना शहा म्हणाले की, मी काँग्रेस नेत्यांची भाषणे ऐकली आहेत. हिमाचल प्रदेशातील परंपरेवर विश्वास ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. मतदारांनी ही परंपरा बदलावी आणि पुन्हा एकदा भाजपला संधी द्यावी.
शहा यांनी असाही आरोप केला, की दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात आई आणि मुलगा काँग्रेस चालवित आहेत. आरोपपत्रात नावे असलेले लोक राज्यात चांगले सरकार कसे चालवू शकतात. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि हिमाचल प्रदेशातील प्रतिभा सिंह व त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांच्याकडे इशारा करत त्यांनी ही टिप्पणी केली.
‘त्यांचे’ दिवस गेले...
ते म्हणाले की, लोकशाहीत राजा - राणीचे दिवस गेले आणि आता सामान्य माणसांचा काळ आला आहे. केंद्रात सरकार असताना काँग्रेस १२ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांसाठी जबाबदार होते. हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.