नवी दिल्ली- फिल्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केली आहे. विविध क्षेत्रातील मंडळींना भारतरत्न देण्यात आला असतानाच एखाद्या लष्करप्रमुखांना हा सर्वोच्च सन्मान का दिला जात नाही, असा सवालही बिपीन रावत यांनी उपस्थित केला आहे.
लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शनिवारी एका कार्यक्रमात करिअप्पा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांची भारतरत्नसाठी शिफारस करण्याची योग्य वेळ आली आहे. अन्य क्षेत्रातील मंडळींना भारतरत्न दिला जातो, मग सैन्यातील पहिल्या लष्करप्रमुखांना का नाही, तेसुद्धा या सर्वोच्च सन्मानासाठी पात्र आहेत, असं बिपीन रावत यांनी म्हंटलं.
करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून सूत्रं स्वीकारली होती. स्वतंत्र भारताचे ते पहिले लष्करप्रमुख होते. अमेरिकेनेही १९५१ मध्ये करिअप्पा यांना सन्मानित केलं. १९५३ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर करिअप्पा यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे. १९५६ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. १९८३ मध्ये त्यांचा ‘फिल्ड मार्शल’ हा किताब देऊन गौरव करण्यात आला होता. करिअप्पा यांनी १९९३ मध्ये बंगळुरू येथे अखेरचा श्वास घेतला.