नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुजराती मतदारांना भावनिक साद घातली. आज एकापाठोपाठ एक केलेल्या ट्विटमधून मोदींनी मतदारांना भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना भावनिक साद घालताना म्हणाले, " 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये रेकॉर्डब्रेक मतदान करा, असे आवाहन मी मी गुजरातमधील बंधू भगिनींना करतो. मी आवाहन करतो की, तुम्ही भारतीय जनता पक्षाला बंपर बहुमत देऊन प्रत्येक बुथवर पक्षाला विजय मिळवून द्या."
गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा, राज्यात दीर्घकाळानंतर सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कसलेली कंबर आणि पटेलांची नाराजी इव्हीएम मशीनमधून व्यक्त होण्यासाठी हार्दिक पटेल यांनी लावलेला जोर यामुळे गुजरात विधानसभेचा प्रचार बऱाचा गाजला. आता हा गुजराती मतदार दुसऱ्या टप्प्यात कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि गुजरातमध्ये कुणाचे सरकार बनवतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.