लोकमत न्यूज नेटवर्क पुदुच्चेरी : आपणास मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करा, अन्यथा आपला पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत न राहता स्वतंत्र निवडणूक लढू, असा इशारा एनआर काँग्रेसचे प्रमुख एन. रंगसामी यांनी दिल्याने भाजप नेत्यांची धावपळ उडाली आहे.
एनआर काँग्रेस हा पुदुच्चेरीतील लोकप्रिय स्थानिक पक्ष आहे. या पक्षाने २०१६च्या विधानसभा निवडणुकांत ८ जागांवर विजय मिळविला होता, तर अण्णा द्रमुकला चार जागा मिळाल्या होत्या. भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. पुदुच्चेरीत विधानसभेच्या ३० जागा असून, भाजपला तिथे कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची आहे. एनआर काँग्रेस व अण्णा द्रमुक यांच्या मदतीशिवाय ती मिळणे अशक्य आहे, याची भाजपला कल्पना आहे. त्यामुळे भाजपला आपल्या आघाडीत एनआर काँग्रेस हवा आहे. आपल्याविना भाजपला राज्यातील सत्ता पाहता येणार नाही, हे माहीत असल्यामुळेच एनआर काँग्रेसनेही मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. पक्षप्रमुख एन. रंगसामी यांनाच ते पद हवे आहे.
अमित शहा संपर्कातरंगासामी यांचा पक्ष आमच्यासोबतच राहील, मुख्यमंत्रिपदाबाबत आमचे केंद्रीय नेते निर्णय घेतील, गृहमंत्री अमित शहा हेही रंगासामी यांच्या संपर्कात आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. स्वामीनाथन यांनी सांगितले. एनआर काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवल्यास त्यांच्या जागा कमी होतील, त्यांना २०१६ इतक्या जागा आता मिळणार नाहीत, असे भाजपचे नेते खासगीत सांगत आहेत.