राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे. राज्यसभेत या चर्चेवेळी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आक्रमक झाले. संजय सिंह बोलत असताना सत्ताधारी बाकावरून कोणीतरी तुरूंगाबद्दल बोलले. त्यानंतर सिंह यांनी भाजपवर हल्ला चढवला. "फक्त तीन तासांसाठी ईडी-सीबीआय माझ्याकडे द्या, सगळ्यांना तुरुंगात पाठवतो", असे संजय सिंह म्हणाले.
संजय सिंह म्हणाले, "10 वर्षात १० बांगलादेशी घुसखोरांना दिल्लीतून माघारी पाठवलं असेल, तर त्यांची नावं सांगावीत. राजकारण का करता? अदानी बांगलादेशला वीज पुरवठा करतात. भारतात वीज चोरी करून बांगलादेशातील घरे प्रकाशमय केली जात आहेत. आम्हाला ज्ञान देत आहात का? झारखंडची वीज चोरी अदानी बांगलादेशला पुरवत आहेत. हे दुटप्पी धोरण चालणार नाही. तुमची मुलं कतारमधील शेखांसोबत व्यवसाय करणार आणि इथे मुस्लिमांच्या विरोधात हिंसा करण्याच्या गोष्टी करता", असे म्हणत संजय सिंह यांनी भाजपवर हल्ला चढवला.
सगळ्यांना तुरुंगात पाठवतो -संजय सिंह
संजय सिंह बोलत असताना सत्ताधारी बाकावरून कोणीतरी तुरुंगाचा उल्लेख केला. त्यावर संजय सिंह यांनी भाजपला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले.
आपचे खासदार सिंह म्हणाले, "ही धमकी देऊ नका. ज्या दिवशी सत्तांतर होईल, एक पण माणूस बाहेर राहणार नाही. फक्त तीन तासांसाठी मला ईडी-सीबीआय द्या. सगळ्यांना तुरुंगात पाठवतो. भाजपचे लोक जेव्हा भ्रष्टाचारावर बोलतात, तेव्हा असे वाटते की, ओसामा बिन लादेन अहिंसेवर उपदेश देत आहे."
"गायींची कत्तल करणाऱ्या कंपनीकडून देणग्या घेणारे लोक माझ्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. लोकांनी निवडून दिलेले सरकार तुम्ही का मानत नाही. दिल्लीतील सरकारला तुम्ही काम का करू देत नाही? प्रत्येक कामात अडथळा का आणता?", असा सवाल संजय सिंह यांनी केला.
संभलच्या प्रकरणावरून संजय सिंह यांनी भाजपला लक्ष्य केले. "यांना वाटतं की, लोक यांना घाबरतील. त्यामुळेच आम्ही ज्यावेळी बोलतो, तेव्हा हे गोंधळ घालतात. देशात सध्या हे भारत खोदा योजना राबवत आहेत. एखाद्या दिवशी कोणीतरी येईल आणि म्हणेल संसद खोदा", अशी टीका सिंह यांनी केली.