नवी दिल्ली- काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींच्या आडून त्यांच्या भक्तांवर निशाणा साधला आहे. भक्तांनो तुमच्या नेत्यांना जरा चांगले सल्ले द्या आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी लक्ष्य द्यायला सांगा, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. केवळ पोकळ घोषणा देण्यापेक्षा आवश्यक बाबींवर लक्ष द्यायला सांगा, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.राहुल गांधी यांनी रविवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये चीन कशा प्रकारे रोजगार उपलब्ध करतो आहे, हे दाखवण्यात आलं आहे. चीन भारतासमोर रोजगाराचं आव्हान उभं करत असताना तुमचे नेते पोकळ घोषणाच देतायत. त्यामुळे कृपा करून हा व्हिडीओ पाहा, जेणेकरून तुम्ही नरेंद्र मोदींना रोजगार उपलब्ध होण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर लक्ष्य देण्याचा सल्ला देऊ शकाल, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी भक्तांना धारेवर धरले आहे. व्हिडीओमध्ये चीनमधील सिलिकॉन व्हॅलीची बाजारपेठ दाखवण्यात आली आहे. तेथे नव्या उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी कशा प्रकारे मदत केली जाते. त्याप्रमाणेच छोट्यात छोट्या तंत्रज्ञानाची कशी दखल घेतली जाते, याची माहिती देण्यात आली आहे. चीनच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असल्याचंही या व्हिडीओतून दाखवण्यात आलं आहे.चीन रोजगार निर्मितीसाठी करत असलेल्या उपाययोजनांचा दाखला देत मोदींना लक्ष्य केलं आहे. त्या प्रमाणेच स्मार्ट सिटीवरूनही राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींनी मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील बारकावे दाखवून दिले आहेत. स्मार्ट सिटीसाठी 9,860 कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यातील केवळ 7 टक्केच निधी म्हणजे फक्त 645 कोटी रुपये वापरले गेल्याचं राहुल गांधींनी अधोरेखित केलं आहे. हे ट्विट करताना राहुल यांनी #BJPEmptyPromises असा टॅग वापरून मोदी सरकारला टार्गेट केलंय.
तुमच्या नेत्यांना जरा चांगले सल्ले द्या, राहुल गांधींची मोदी भक्तांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 17:40 IST