ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 4 - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीची माहिती बुधवारपर्यंत सादर करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. संबंधित अधिका-यांना हे आदेश देण्यात आले आहेत. जयललिता यांच्या प्रकृतीची माहिती मिळवण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्याच्या संबंधित अधिका-यांना माहिती उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ता रामास्वामी यांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यातील लोकांनी जयललिता यांच्या प्रकृतीची माहिती हवी आहे असं रामास्वामी यांनी याचिकेत म्हटलं आहे. सोबतच रुग्णालयात जयललितांसोबत झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीचे फोटोही जारी करण्यात यावेत अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव आणि केंद्रीय मंत्री राधाकृष्णन यांनी रुग्णालयात जाऊन जयललिता यांची भेट घेतली होती, मात्र त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली नव्हती असंही याचिकेत सांगण्यात आलं आहे.
ताप आणि डिहायड्रेशनमुळे 22 सप्टेंबरला मुख्यमंत्री जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. उपचारासाठी ब्रिटीश डॉक्टरांनाही बोलवाण्यात आलं होतं. रविवारी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करत जयललिता यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. ज्यानुसार प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून त्यांना काही दिवस रुग्णालयातच राहण्याचा सल्ला दिल्याचं सांगण्यात आलं होतं.