Rohit Pawar: राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत सरकारला जेरीस आणणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी जोरदार घणाघात केला आहे. भाजपानं किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं, असा टोला रोहित पवार यांनी सोमय्या यांना लगावला आहे. ते दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार फडकवणार ‘भगवा झेंडा’; देशाच्या नव्हे तर जगाच्या भूवया उंचावणार
रोहित पवार गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारशी निगडीत आपल्या मतदार संघातील काही विषयांबाबत संबंधित मंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आल्याचं रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाया आणि सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं असता रोहित पवार यांनी किरीट सोमय्यांवर जोरदार निशाणा साधला.
"सोमय्यांना भाजपानं खरंतर एक ऑफिशियन पोस्ट द्यायला हवी. ईडीचे प्रवक्ते अशी काहीतरी पोस्ट त्यांना द्यावी. आता त्यांच्याकडे एक प्रतिनिधी एवढंच पद आहे. त्यांना प्रवक्तेपद दिलं तर ईडीचे प्रतिनिधी आहेत हे ऑफिशियन होऊन जाईल. कारण ईडीला कळायच्या आधीच त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्यांच्यावर टेलिव्हिजनचाही फोकस असतो. त्यामुळे त्यांना हे पद द्यायला काही हरकत नाही", असं रोहित पवार म्हणाले.
देशात एखाद्या पक्षाचं बहुमतानं सरकार आलं तर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायला हवं. ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा राजकीय वापर होत असेल तर ते ठिक नाही. हे अतिशय घातक आहे. कारण एखाद्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो आणि तो कालांतरानं त्यातून निर्दोष मुक्तही होतो. पण या दरम्यान त्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. समाजाचा दृष्टीकोनही बदलतो आणि हे अतिशय वाईट आहे. व्यक्ती निर्दोष मुक्त झाला तरी यातून राजकीय मनस्तापच होतो. हे थांबलं पाहिजे, असंही रोहित पवार म्हणाले.