अमृतसर - लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वपक्षीय नेत्यांना आणि मंत्र्यांनाच इशारा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी पंजाब कॅबिनेटमधील मंत्र्यांना, नेत्यांना आणि आमदारांना आपापल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याचं सांगितलं आहे. जर तसं झालं नाही तर त्या नेत्याचे मंत्रीपद काढून घेतलं जाईल असा इशाराच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिला आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कडक शब्दात हा इशारा काँग्रेस पक्षातील मंत्री आणि आमदारांना दिला आहे. त्यामुळे जर या नेत्यांनी ज्या जिल्ह्यात त्यांचा प्रभाव आहे अशाठिकाणी मताधिक्य मिळालं नाही तर ते नेते मंत्रीपद गमावू शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेस नेत्यांना मोठं आव्हान असणार आहे त्यावर भविष्यातील त्यांचे मंत्रीपद पणाला लागलं आहे. तसेच काँग्रेस आमदारांना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले आहे की, आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे. जर मतदान कमी झालं तर पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यामुळे काँग्रेस आमदारांचे भवितव्यही लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर अवलंबून असणार आहे.
दरम्यान त्याचसोबत पक्षात फक्त ज्येष्ठ असून चालणार नाही तर लोकसभा निवडणुकीत नेत्यांची कामगिरी पक्षातील त्यांचे भवितव्य ठरवणारी आहे. नेत्यांच्या कामगिरीवर पक्षामध्ये पद आणि सरकारमध्ये मंत्रीपद दिलं जाईल. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अशाप्रकारे नेत्यांना दिलेलं आव्हान म्हणजे पक्षात परफॉर्मेस बेस्ड कल्चरला चालना देण्यासाठी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रत्येक जागा जिंकण्यासाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र देशातील सत्ता कोणाला द्यायची हे जनतेने दिलेल्या मतदानावर अवलंबून आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कामगिरी कोणता पक्ष चांगला करतो हे निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.