वडनगर (मेहसाणा, गुजरात) : गावक-यांच्या प्रेमाने आज मी भारावून गेलो आहे. या प्रेमाच्या जोरावर आता देशसेवेसाठी दुप्पट जोमाने झोकून देईन. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, पण भगवान शिवशंकराने आणि वडनगर या जन्मगावाने विष पचविण्याचीही ताकद मला दिली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या आपल्या जन्मगावी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच भेट दिल्यानंतर ते बोलत होते.पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौ-यावर असून या ठिकाणी त्यांनी आज रोड शो केला. या वेळी रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. तसेच त्यांनी एका मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केले. त्यानंतर एका सभेला ते संबोधित करत होते. ज्या ठिकाणी शिक्षण घेतले होते त्या शाळेला आज मोदी यांनी भेट दिली. बी.एन. हायस्कूल परिसरातील माती त्यांनी कपाळाला लावली. याच वडनगरमध्ये रेल्वे स्टेशनवर मोदी कधी काळी चहा विक्री करत होते. गुजरात ते दिल्ली या प्रवासातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गुजरातमध्ये ते १३ वर्षे मुख्यमंत्री होते.महादेव मंदिरात पूजा-मोदी म्हणाले की, भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने २००१ पासून मी देशसेवा करत आहे. या काळात अनेक लोकांनी माझ्यावर विष ओकले आहे. २००२ च्या गुजरात दंगलीनंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा बहुधा ते संदर्भ देत होते. वडनगरने मला विष पचविण्याची ताकद दिली, असे सांगून काशीप्रमाणेच आपले जन्मस्थान शिवभूमी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री विजय रुपानी हे हाटकेश्वर महादेव मंदिरातही गेले. तेथे त्यांनी पूजा अर्चना केली.
विष पचविण्याची ताकद मला जन्मगावाने दिली, मोदींची वडनगरला भेट; आठवणींना दिला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 3:30 AM