ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24- देशविरोधी घोषणाबाजीमुळे चर्चेत आलेलं दिल्लीचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. जेएनयूचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जनरल व्ही.के. सिंह यांच्याकडे संस्थेच्या आवारात ठेवण्यासाठी लष्करी रणगाडा द्यावा, अशी मागणी केली आहे. जेएनयूमध्ये हा रणगाडा ठेवला तर तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याने दिलेल्या बलिदानाचं नेहमी स्मरण होत राहील, असं एम जगदेश कुमार यांचं मत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पहिल्यांदाच कारगिल विजय दिवस साजरा केला गेला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने शहिदांच्या स्मरणार्थ जेएनयूचं गेट ते कन्वेंशन सेंटरपर्यंत 2200 फूटाच्या झेंड्यासह तिरंगा मार्च काढण्यात आला.
आणखी वाचा
एकवेळ डोंगर हलवणं सोपं, पण आम्हाला नाही...चीनची भारताला धमकी
१९७१ च्या युद्धाचे पाकने भान ठेवावे!
लष्करी उपकरणे, सुटे भाग भारतात विकसित करणार
भारतीय सैन्याने देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या बलिदानामुळे कारगिल विजय दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने मी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि व्ही.के. सिंह यांना विनंती करतो की, त्यांनी जेएनयूमध्ये लष्करी रणगाडा आणण्यासाठी आम्हाला मदत करावी. हा रणगाडा संस्थेच्या आवारात ठेवला जाईल. जेणेकरून या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सैन्याच्या बलिदानाचं आणि त्यांच्या उज्ज्वल परंपरेचं भान राहील, असं यावेळी एम जगदेश कुमार म्हणाले आहेत.
फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांकडून निदर्शनं करण्यात आली होती. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. यावरून अनेकजणांना अटकही झाली होती. हे प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा जेएनयूमध्ये ‘राष्ट्रवादाचे प्रतिक’ म्हणून रणगाडा ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता विद्यापीठाचे कुलगुरू एम जगदेश कुमार यांनीच ही मागणी उचलून धरली आहे. जेएनयूतील या सोहळ्यात धर्मेंद्र प्रधान, व्ही.के. सिंह, क्रिकेटपटू गौतम गंभीर, निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी, लेखक राजीव मल्होत्रा उपस्थित होते.