नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर विदेश दौऱ्यांवर जाणाऱ्या व्यक्तींची नावे जाहीर करा, असे निर्देश केंद्रीय माहिती अधिकार आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. मुख्य माहिती अधिकार आयुक्त आर. के. ठाकूर यांनी पंतप्रधान कार्यालयाला खडसावत मोदींसोबत परदेश दौऱ्यांवर जाणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्यांची नावं 30 दिवसांच्या आत जाहीर करावीत, असे निर्देश दिले आहेत.मोदींबरोबर परदेश दौऱ्यावर जाणाऱ्यांची माहिती नीरज शर्मा आणि अयुब अली यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. मात्र, त्यांना माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयानं नकार दिला. शर्मा यांनी खासगी कंपन्यांचे सीईओ, मालक अथवा भागीदार, तसंच खासगी उद्योगांतील अधिकाऱ्यांची माहिती मागितली होती.
सुरक्षा अधिकारी आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीच्या माहितीशी संबंधित व्यक्तींची नावं जाहीर करण्यापासून मुख्य माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला सूट दिली आहे. पंतप्रधानांसोबत विदेशी दौऱ्यांवर जाणाऱ्या बिगर सरकारी व्यक्ती अथवा सुरक्षेशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना दिली पाहिजेत, असं ते म्हणाले.