नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेला ‘पंतप्रधान’ अथवा अन्य राष्ट्रीय नेत्यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपटाचे प्रदर्शन करण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीवर सरकारने तयार केलेले माहितीपट प्रत्येक चित्रपटगृहात दाखविणे बंधनकारक केले जाऊ शकते.राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजना आणि कामगिरीबाबत माहिती देण्यासाठी उपाययोजना सुचविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मंत्री गटाने, केंद्रीय योजनांसोबत ‘पंतप्रधान’ व अन्य राष्ट्रवादी नेत्यांचे नाव जोडणे आणि सरकारच्या कामगिरीबाबत चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी माहितीपट दाखविणे सक्ती करण्याची शिफारस केली आहे.सांसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील पार पडलेल्या या मंत्री गटाच्या बैठकीत वितरित करण्यात आलेल्या परिपत्रकात या शिफारशी करण्यात आल्या आहेत. भूतकाळात आणि वर्तमानात फरक दर्शविणारी आणि सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा असलेली अॅनिमेशन क्लिपदेखील तयार करण्यात आली पाहिजे, अशी आणखी एक शिफारस या गटाने केली आहे. मंत्री गटाच्या या शिफारशी अमलात आणण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाला सोबत घेण्याची सूचना करण्यात आली आहे. दर दोन आठवड्यांत सरकारची कामगिरी सांगण्यासाठी एक माहितीपट तयार करण्याची शिफारस या मंत्री गटाने केली आहे. हा माहितीपट प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्याआधी दाखविणे अनिवार्य राहील.
योजनांना पंतप्रधान अथवा अन्य नेत्यांचे नाव देणार
By admin | Published: April 25, 2016 3:51 AM