लखनऊ : जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे. जेएनयू आणि जामियामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी मेरठच्या कॉलेजमध्ये सीएएच्या बाजुने बसले आहेत. जर या विद्यापीठांमध्ये 10 टक्के आरक्षण दिले तर जेएनयू-एएमयूचा इलाजच करून टाकू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते.
पशूपालन, डेअरी आणि मत्स्य पालन राज्यमंत्री बालियान यांनी सांगितले की, पाकिस्तानातून जे शरणार्थी भारतात आले आहेत त्यापैकी आमच्याकडे आठ कुटुंबे आहेत. सीएए मंजूर होण्याआधी मलाही याबाबत माहिती नव्हती. मात्र, जेव्हा या कुटुंब प्रमुखांशी बोलणे झाले तेव्हा समजले. एका प्रमुखाने सांगितले की, पाकिस्तानात कशाप्रकारे हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्या मुलींना जबरदस्ती उचलून नेले जाते. अशा प्रकारे पिडीत कुटुंबांना जर भारतात नागरिकत्व मिळत असेल तर त्याला विरोध करत आहेत, असे बालियान म्हणाले.
उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, मोदी यांनी चांगले काम केले आहे, ते या लोकांना पटलेले नाही. भारताचे तुकडे तुकडे करणारे सुधारले तर देशासमोर कोणीही टीकू शकणार नाही. सीएएचा विरोध करणाऱ्यांना जेव्हा मिडीयाने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे कशी होती. कोणाला काहीच माहिती नव्हते. षड्यंत्र रचत य़ा लोकांच्या हातात दगड दिले गेले होते.
बालियान यांच्या भाषणावेळी राजनाथ सिंहही व्यासपीठावर होते. त्यांच्याकडे पाहूनच ''तुम्हीच काहीतरी करू शकाल, पश्चिमी विद्यार्थ्यांसाठी जर 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-एएमयूचा इलाजच करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे.