भोपाळ : आपला पक्ष केंद्रात सत्तेवर आला तर देशातील इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले. मध्य प्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील कालापिपल विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
देशातील ओबीसींची नेमकी संख्या कोणालाच माहीत नाही. सत्तेवर येताच जातनिहाय जनगणना करणार आहोत, असे गांधी म्हणाले. कॅबिनेट सचिव व सचिवांसह केवळ ९० अधिकारी देश चालवत असल्याचा दावा त्यांनी केला. धोरणे व कायदे बनवण्यात भाजप खासदार व आमदारांची कोणतीही भूमिका नाही. निवडून आलेल्या भाजप सदस्यांऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व नोकरशहा कायदे बनवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. (वृत्तसंस्था)
मध्य प्रदेश देशातील भ्रष्टाचाराचे केंद्र
मध्य प्रदेश हे भ्रष्टाचाराचे केंद्र असल्याचे सांगून गांधी म्हणाले, व्यापमंसारख्या घोटाळ्यांनी राज्य हादरले आहे. एमबीबीएसच्या पदव्या विकल्या जात आहेत, परीक्षेचे पेपर फोडून विकले जात आहेत. महाकाल लोक कॉरिडॉरसह विविध बांधकामांत भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या १८ वर्षांत १८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.