बंगळुरू : महाराष्ट्राच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले असून प्रथमच एकमेकांविरोधात गेली अनेक वर्षे लढलेले परस्पर विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशातच माजी पंतप्रधान आणि कर्नाटकात नुकतीच सत्ता गमवावी लागलेल्या जेडीएस पक्षाचे नेते एच डी देवेगौडा यांनी काँग्रेसला मोलाचा सल्ला दिला आहे.
कर्नाटकमध्येही दोन वर्षांपूर्वी काहीसे महाराष्ट्रात आता वातावरण आहे तसेच वातावरण होते. भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळाले होते. मात्र, सत्ता गमावलेल्या काँग्रेसने कमी जागा असलेल्या जेडीएसला पाठिंबा देत सरकार स्थापन केले होते. जेडीएसच्या कुमारस्वामींनी 18 महिने रडतखडत सरकार चालविले होते. अखेर कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे देत हे सरकार पाडले होते. यामागे भाजपाचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांची खेळी असल्याचे बोलले जाते. कर्नाटकमध्ये पुढील महिन्यात 5 डिसेंबरला या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या सगळ्या नाट्यामध्ये जेडीएसचे हात पोळले होते. आता त्याच पक्षाच्या प्रमुखाने काँग्रेसला सल्ला दिला आहे.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या लवकरच शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर निर्णय घेणार आहेत. यातच जेडीएसचे देवेगौडा यांनी सल्ला देताना महाराष्ट्रात काँग्रेस जर शिवसेनेला पाठिंबा देणार असेल तर त्यांच्यासोबत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ रहावे. त्यांना सरकार चालवू द्यावे.
जर काँग्रेस शिवसेनेला समर्थन देत असेल तर पुढील पाच वर्षे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. तरच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवू लागतील, अशी प्रतिक्रिया देवेगौडा यांनी दिली आहे.