ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - प्रेमाचे प्रतिक अशी ओळख असलेले आग्र्याचा ताजमहल ५ वेळा नमाज अदा करण्यासाठी ताब्यात द्या अशी मागणी लखनऊमधील मौलाना खालीद राशिद फारंगी महेली यांनी केली आहे. फारंगी यांच्या या मागणीमुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ताजमहल बांधणा-या शाहा जहाँसाठी स्मारकाच्या बाजूला दर शुक्रवारी (जुम्मा) या दिवशी नमाज अदा करण्याची सध्या परवानगी आहे. परंतू दिवसातून पाच वेळेस नमाज पढण्यासाठी परवानगी पाहिजे अशी मागणी लखनऊच्या ऐशबाग ईदगाहचे मौलवी फारंगी महेली यांनी केली आहे. फारंगी हे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी)चे सदस्य आहेत. मुघल काळात प्रेमाचे प्रतिक म्हणून ताज महलची निर्माती करण्यात आली आहे. दरम्यान, ताजमहल आणि त्यामधून होणारी मिळकत ही राज्याच्या वक्फ बोर्डाकडे सोपविण्यात आली पाहिजे, कारण ताजमहलचे स्मारक हे केवळ एक मकबरा आहे. आणि प्रत्येक मकबरा ही वक्फ बोर्डाची मालकी असल्याचे समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी म्हटंले आहे. ताज महल सुन्नी केंद्रीय वक्फ बोर्डाकडे सोपविण्यात यायला हवे, त्या ठिकाणी मुस्लीम अधिकारी नेमून मिळणा-या मिळकतीतून मुस्लीम समाजातील मुलांना शिक्षण घेता यावी यासाठी व्यवस्था करायला हवी, असे आझम खान यांनी सुचविले आहे.
दरम्यान, ताज महलमध्ये ५ वेळा नमाज अदा करण्याच्या मागणीला भाजपामधील मुस्लीम नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी तीव्र विरोध दर्शविला. ताज महलमध्ये नमाज अदा करण्यासाठी परवानगी मागणे चुकीचे आहे असे सांगतानाच नकवी म्हणाले की, आज ताज महल मागितला, उद्या लाल किला, परवा आणखी कशाची तरी मागणी करण्यात येईल. अशी मागणी करणे चुकीचे असल्याचे अब्बास नकवी म्हणाले. ताज महलची व्यवस्था पाहण्याचे काम सध्या एएसआय अर्थात आर्कियॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे आहे. याठिकाणी दरवर्षी ८० लाखापेक्षा अधिक पर्यटक येत असून दरदिवशी सात ते आठ हजार तिकीट विक्री होते. या तिकीटविक्रीमधून वर्षभरात २५ ते ३० कोटी रूपयांची कमाई होते. ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात कमाई होते त्या ठिकाणी केंद्र सरकारने आपला अधिकार ठेवला असून कमी मिळकत असलेले ठिकाण मात्र वक्फ बोर्डाकडे सोपविल्याचा आरोप आझम खान यांनी केला आहे.