सर्वांची कोरोना चाचणी करा, बाधितांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये द्या; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 01:52 PM2020-06-15T13:52:34+5:302020-06-15T13:55:00+5:30

कोरोनामुळे राजधानी दिल्लीत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती.

give ten thousand rupees to the families of the corona positive person; Congress demand | सर्वांची कोरोना चाचणी करा, बाधितांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये द्या; काँग्रेसची मागणी

सर्वांची कोरोना चाचणी करा, बाधितांच्या कुटुंबीयांना दहा हजार रुपये द्या; काँग्रेसची मागणी

Next

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राजधानी दिल्लीत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती. या बैठकीत काँग्रेसने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सल्ले सरकारला दिले. 

कोरोनाची चाचणी करून घेणे हा सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे सर्वांची चाचणी झाली पाहिजे.  तसेच कोरोनाचा संसर्ग झालेली कुटुंबे आणि आणि कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली. त्याबरोबरच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी, त्यासाठी नर्सिंग, मेडिकल आणि फार्मा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी, असा सल्ला काँग्रेसने दिला. 

तसेच काँग्रेसने या सर्वपक्षीय बैठकीत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वेच्या एसी कोचसोबत स्टेडियम, प्रदर्शन स्थळे, विद्यापीठांची वसतीगृहे यांचा वापर क्वारेंटाईन सेंटर आणि आयसोलेशन सेंटर म्हणून करावा, असा सल्लाही गृहमंत्री आणि केंद्र सरकारला दिला. 

कोरोनाला रोखण्यासाठी एक व्यापक रणनीती ठरवण्यासाठी केंद्र सरकारने ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, आपचे नेते संजय सिंह, काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी उपस्थित होते. तसेच या बैठकीला केंद्रीय गृहसचिव, केंद्रीय आरोग्य सचिव, दिल्लीचे मुख्य सचिव आणि दिल्ली सरकारचे प्रिंसिपल सेक्रेटरी हेल्थ उपस्थित होते.

Web Title: give ten thousand rupees to the families of the corona positive person; Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.