लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: शेजारी देश चीनमध्ये कोविड रुग्णांच्या अचानक वाढीमुळे भारतात आणखी एका कोविड लाटेची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस द्यावा, असे साकडे थेट डॉक्टरांनीच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना घातले आहे.
मांडविया यांनी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांची बैठक घेतली. त्यातच देशात साथीची परिस्थिती टाळण्यासाठी कोविड लसीच्या दुसऱ्या बूस्टर डोसला परवानगी देण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीनंतर, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांनी निदर्शनास आणून दिले की, कोविड लसीचा बूस्टर डोस आरोग्य आणि अत्यावश्यक कामगारांना सुमारे एक वर्षापूर्वी दिला गेला होता आणि आता त्याचा विषाणूविरुद्ध फारसा परिणाम होणार नाही. लोकांसाठी, विशेषत: डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि रुग्णांचे व्यवस्थापन करणाऱ्या आणि जास्त धोका असलेल्या स्वच्छता कामगारांसाठी सावधगिरी म्हणून चौथा डोसचे आवाहन केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"