विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी दिग्गजांच्या घरवापसीची चर्चा रंगू लागली आहे. अनेक नेत्यांना भाजप व जदयूकडून उमेदवारीची अपेक्षा आहे. बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागांवर भाजप व जदयूचे खासदार आहेत. भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना उमेदवारीची अपेक्षा आहे; परंतु केवळ ४० जागा असल्याने किती जणांना उमेदवारी मिळेल, हे सांगता येत नाही. अशा स्थितीत अनेकांची घरवापसी होऊ शकते.
भाजप आपल्या छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडणार असल्याची चर्चा आहे. पक्षाकडून उपेंद्र कुशवाहा व चिराग पासवान यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चा (हम) पक्षाला जागावाटपाबाबत राजी करण्यात आले आहे. ‘हम’ला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागेल. या पक्षाला किमान दोन जागा हव्या आहेत. जागावाटपाची कोंडी चिराग पासवान यांच्यामुळे कायम आहे. चिराग यांना किमान सहा जागा हव्या आहेत. त्याचवेळी भाजपला पशुपती कुमार पारस यांचेही मन राखायचे आहे.
राजदमध्ये उमेदवारांसाठी मोठी संधी
- राजकीय तज्ज्ञांच्या मते, इतर पक्षांच्या तुलनेत राजदमध्ये सहज उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. - सध्या त्यांचा एकही खासदार नाही. त्यामुळे प्रबळ उमेदवारांसाठी मैदान रिकामे आहे.
छत्तीसगडच्या भाजप नेत्यांनी मागितली झेड सुरक्षेची मागणी
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून भाजपच्या दोन नेत्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या बिजापूर जिल्हा शाखेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून आपल्या पदाधिकाऱ्यांना ‘झेड’ श्रेणी सुरक्षा देण्याची विनंती केली आहे. या पत्रात भाजपचे बिजापूर जिल्हाप्रमुख श्रीनिवास मुदलियार यांनी म्हटले की, राज्यातील भाजप सरकारच्या नक्षलविरोधी कारवायांमुळे नक्षलवादी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करीत आहेत. १ मार्च रोजी भाजप नेते तिरुपती कतला यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती, तर ६ मार्च रोजी एका हल्ल्यात आणखी एक स्थानिक भाजप नेते कैलाश नाग मारले गेले.