Ayodhya Ram Mandir: राम जन्मभूमी अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माण कार्य वेगाने सुरू आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाची प्रतिष्ठापणा होईल. राम मंदिरामुळेअयोध्या शहराचा कायापालट होणार आहे. विविध राज्ये शहरात अतिथीगृह उभारत आहेत. दरम्यान, तीन देशांनीही उत्तर प्रदेश सरकारकडे अयोध्येत जागेची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश गृहनिर्माण मंडळाने नवीन अयोध्या टाऊनशिप प्रकल्पात राज्य अतिथीगृहासाठी गुजरातला आधीच 6,000 चौरस मीटर जमीन दिली आहे. टाउनशिप प्रकल्प हाऊसिंग बोर्डाद्वारे लागू केला जाईल आणि लखनौ-अयोध्या NH-27 वर 1,407 एकर जमिनीवर बांधला जाईल. नंतर प्रकल्पाचा विस्तार 1,800 एकरांपर्यंत होणार आहे.
दरम्यान, अयोध्या प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, नेपाळ, श्रीलंका आणि दक्षिण कोरियानेही अयोध्येत 5 एकर जमीन मागितली आहे. त्यांना ही जमीन नवीन अयोध्या टाऊनशिप प्रकल्पात दिली जाईल. नवीन टाऊनशिप दोन टप्प्यात बांधली जाणार असून, पहिल्या टप्प्यात 539 एकर जमिनीवर काम सुरू होईल. 11 नोव्हेंबरला अयोध्येत दीपोत्सव सोहळ्यानंतर प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
अयोध्या प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पासाठी अयोध्येजवळील अनेक गावांमध्ये जमीन खरेदी करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंडळाचे अतिरिक्त गृहनिर्माण आयुक्त नीरज शुक्ला यांनी सांगितले की, गृहनिर्माण मंडळाला मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, सिक्कीम, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातून जमीन वाटपासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.