नवी दिल्ली: लग्न झाल्यानंतर अनेकजण आपल्या मुलाकडून नातवंडाची इच्छा व्यक्त करतात. यासाठी अनेकदा छळही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण, उत्तराखंडमधून एक विचत्र प्रकरण समोर आले आहे. एका दाम्पत्याने नातवंडांसाठी आपल्या मुलगा आणि सुनेवर 5 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एसआर प्रसाद यांनी आपला मुलगा आणि सुनेविरोधात नातवंडांसाठी दावा ठोकला आहे. न्यायालयात ते म्हणाले की, 'आम्हाला नातू किंवा नात हवी आहे. मुलांनी आम्हाला एका वर्षाच्या आत नातू किंवा नात द्यावी, अन्यथा 5 कोटी रुपये द्यावेत.' मुलाच्या उच्चशिक्षणासाठी प्रसाद यांनी त्याला अमेरिकेत पाठवले. त्यासाठी त्यांनी सर्व पैसे खर्च केले. आता त्यांच्याकडे कुठलेही पैसे नाहीत.
एएनआयने प्रसादच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'मी माझे सर्व पैसे मुलाला दिले, त्याला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले. आता माझ्याकडे पैसे नाहीत. घर बांधण्यासाठी आम्ही बँकेकडून कर्जही घेतले आहे. मी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. आमच्या याचिकेत आम्ही मुलगा आणि सुनेकडून प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आम्ही नातवंडांच्या आशेने 2016 मध्ये मुलाचे लग्न केले, पण अद्याप आम्हाला नातूही दिला नाही. त्यामुळे आता त्यांनी नातू द्यावा किंवा 5 कोटी रुपये द्यावेत.'