नवी दिल्ली : आपले मतदान कोणाला झाले हे कळण्यासाठी पोच पावती देणाऱ्या मतदान यंत्राची चाचणी मध्य प्रदेशातील भिंड येथे घेण्यात आली. तथापि, या चाचणीत मतदान कोणालाही केले तरी मतदान यंत्रातून भाजपाच्याच चिन्हाच्या पावत्या बाहेर येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा अहवाल निवडणूक आयोगाने मागविला आहे. भिंडमध्ये पुढील आठवड्यात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत अत्याधुनिक मतदान यंत्र वापरण्यात येणार आहेत. त्यात आपले मतदान कोणाला झाले, हे दर्शविणारी पोच पावती यंत्रातून बाहेर येण्याची सोय असेल. या यंत्रास ‘व्होटर-व्हेरिफिकेबल पेपर आॅडिट ट्रायल’ (व्हीव्हीपॅट) असे नाव आहे. या यंत्राचा परिचय व्हावा यासाठी भिंडमध्ये त्याचे एक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकाचे वेळी भलताच प्रकार समोर आला.मतदान कोणत्याही पक्षाला केले, तरी या यंत्रातून पावती मात्र भाजपाच्या चिन्हाचीच बाहेर येत असल्याचे दिसून आले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. सायंकाळपर्यंत हा अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)येथे प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, मतदान कोणालाही केले तरी पावती भाजपाच्याच चिन्हाची बाहेर येत असल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकारी सलीना सिंग यांनी ही माहिती प्रसिद्ध करू नका, अशा सूचना उपस्थित पत्रकारांना दिल्या. सूचनांचे पालन न केल्यास पोलिसांमार्फत अटकेची कारवाई करण्याची धमकीही त्यांनी दिली.
मत कोणालाही द्या, पण जाते कमळालाच
By admin | Published: April 02, 2017 1:02 AM