नवी दिल्ली - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशातील अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. अद्यापही कोरोनाचं संकट पूर्णपणे दूर झालं नाही. जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही तब्बल 17 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनच्या वुहानमधूनच कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. चीनवर असे आरोपही केले जात असतानाच, चीनने वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे.
चीनमधील वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. विशेष म्हणजे चीनच्या सरकारी मंत्रालयानेही या मागणीचे समर्थन केले आहे. त्यामुळे, जगभरातून चीनी मीडियासह चीनी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. चीनचं सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियांग यांनी म्हटलं की, वुहान इंस्टीट्यूमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी सर्वप्रथम कोरोना व्हायरसचा जीन शोधून काढल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे.
गेल्याच आठवड्यात चीनच्या व्हायरोलॉजिस्ट आणि बॅट वुमेनच्या नावाने कुख्यात असलेल्या शी झेंगली यांनीही रागात येऊन, कोरोना व्हायरसच्या निर्मित्तीला चीनची लॅब जबाबदार असल्याचं स्पष्टपणे नकारले होते. त्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियांनी यांनीही वुहानच्या लॅबमुळेच कोरोना जगभर पसरला, असे म्हणणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच, जर येथील वैज्ञानिकांनी सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू शोधला असेल तर या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करायला हवं, असेही झाओ यांनी म्हटलं.
वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघळांना जिवंत ठेवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वुहानच्या प्रयोगशाळेवरील संशय अधिकच वाढला आहे. वुहान येथील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत विविध विषाणू आणि त्यांच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारावर संशोधन करण्यात येते. याआधी अनेक संशोधकांनी वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघूळ ठेवल्याचा दावा केला आहे. 'चायना अकादमी ऑफ सायन्स'ने मे 2017 मध्ये एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. या व्हिडीओत वटवाघळांना पिंजऱ्यात ठेवले असल्याचे दिसून आले होते. वुहान प्रयोगशाळेतील नवीन बायोसेफ्टी लेव्हल 4 वरील सुरक्षा सुरू करण्यात आल्यानंतर हा व्हिडिओ जारी करण्यात आला. यामध्ये प्रयोगशाळेत एखादा अपघात झाल्यास सुरक्षा मानके काय आहेत, याची माहिती देण्यात आली होती.