नवी दिल्ली : गोंधळ आणि गदारोळात दोन्ही सभागृहांचा वेळ वाया जाऊ नये याकडे लक्ष द्या व संसदेत आलेल्या तरुण नेत्यांना बोलण्याची संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. देशाच्या स्वातंत्र्याचा ‘अमृत काल’ हा केवळ नवीन विकसित भारत घडवण्याचा काळ असेल, या काळात हे राष्ट्र जगाच्या भविष्याची दिशा ठरविण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
मोदी यांनी बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन अधिक फलदायी करण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उच्च सभागृह चालविण्याची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, काही दिवसांपूर्वीच जगाने भारतावर जी-२० गटाच्या यजमानपदाची जबाबदारी सोपवली. ही वेळ अमृत कालाची सुरुवात आहे. हा अमृत काल हा नवा विकसित भारत घडविण्याचा काळ तर असेलच, पण या काळात जगाची भावी दिशा ठरवण्यातही भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.
भारताची क्षमता जगापुढे मांडण्याची संधीदेशासंबंधी अत्यंत महत्त्वाचे कायदे तसेच जी-२० संबंधित अनेक महत्वाचे निर्णय या अधिवेशनात होतील. जी-० शिखर परिषदेत भारताची क्षमता जगासमोर मांडण्याची संधी आहे. एवढा मोठा देश, लोकशाही, इतकी विविधता, एवढी क्षमता, हे सर्व जगाला कळायला हवे. भारताला आपली क्षमता संपूर्ण जगाला दाखवण्याची ही मोठी संधी आहे. यापूर्वी सर्व पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे. त्याचे प्रतिबिंब सभागृहातही दिसणार आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पहिल्या दिवशी उपराष्ट्रपतींचे केले अभिनंदनउपराष्ट्रपती झाल्यानंतर धनखड यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी पहिल्यांदाच राज्यसभेचे कामकाज चालवले. धनखड यांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा आपला वारसा केवळ पुढे नेणार नाही तर नवीन उंचीवर नेईल. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती म्हणून दलित पार्श्वभूमी आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदिवासी पार्श्वभूमीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, धनखड हे शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत आणि आज ते देशाच्या गावाचे, गरीब आणि शेतकऱ्यांच्या ऊर्जेचे वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व करत आहेत.