नवी दिल्ली - नंदादेवी या हिमालयीन शिखराजवळील हिमकडा कोसळून रविवारी आलेल्या जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये धरण प्रकल्पावरील 203 कर्मचारी बेपत्ता असून 18 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली आहे. उत्तराखंडमधील तपोवनातील हिमकडा कोसळल्याने (Glacier Burst in Uttarakhand) तिथल्या एक बोगद्यातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. त्यामुळे त्या बोगद्यात काम करणारे अनेक कर्मचारी अडकून पडले. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान एक 34 वर्षीय व्यक्ती बोगद्याच्या बाहेर बसून आपला भाऊ सुखरूप रित्या बाहेर येईल याची वाट पाहत आहे.
सती नेगी असं या महिलेचं नाव असून ती बोगद्याच्या बाहेर बसून आपल्या भावाची वाट पाहत आहे. सती नेगीने भावाशिवाय या जगात तिचं कोणीचं नसल्याचं म्हटलं आहे. सात वर्षांपूर्वीच सती यांच्या पतीचं निधन झालं आहे. तेव्हापासून त्या आपला भाऊ परमिंदर बिष्ट याच्याकडेच राहतात, तोच तिचा शेवटचा आधार आहे. मात्र आता या दुर्घटनेनंतर ती आपल्या भावाला पुन्हा भेटू शकेल का? ही भीती सतीला आता सतावते आहे. सतीचा तिचा भाऊ देखील एनटीपीसीच्या तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकल्याचं वाटत आहे. 1900 मीटर लांबीच्या या बोगद्यात 35 लोक अडकल्याचं बोललं जात आहे.
सतीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तिचं भावाशी शेवटचं बोलणं झालं. तो रविवारी काम संपवून गोपेश्वरमध्ये आपल्या कुटुंबास (पत्नी, मुले आणि आई) भेटायला जात असल्याचं त्याने सांगितलं. साधारण आठवडाभराची सुट्टी घेतल्यानंतर तो घरी येणार होता, मात्र त्याआधीट हे सर्व घडलं. रविवारी सकाळी हिमकडा कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सती त्वरित तपोवनला रवाना झाली. सुमारे 2 तासांनंतर ती बोगद्याजवळ पोहोचली. सतीने तिचा भाऊ गेल्या 7 वर्षांपासून त्या साईटवर काम करत असल्याचं म्हटलं आहे.
"लोक येथे येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, पण माझ्या भावाचे काय?, त्याच्या मुलांचं, बायकोचं काय होईल?"
कोणताही अधिकारी त्यांना मदत करू शकत नाही असं सतीने म्हटलं आहे. लोक येथे येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, पण माझ्या भावाचे काय?, त्याच्या मुलांचं, बायकोचं काय होईल?, असा सवालही सतीने उपस्थित केला आहे. सोमवारी सकाळपासून आईने काहीही खाल्लेलं नाही. कोणीही आम्हाला मदत करत नाही अशी भावनाही सतीने बोलून दाखवली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. जलप्रलयामुळे रैनी येथे ऋषिगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे. त्याच्यापासून पाच किमी अंतरावर तपोवन धरणाचे काम सुरू आहे. त्याचेही मोठे नुकसान झाले. या प्रकल्पाच्या एका बोगद्यात 34 कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांची सुटका करण्यास एनडीआरएफ व आयटीबीपीच्या 300 जवानांनी बचावकार्य हाती घेतलं आहे.