अभिलाष खांडेकरनवी दिल्ली : विस्तीर्ण भारतात वाघांचे जतन व संरक्षण करण्यात अनेक आव्हाने असली तरी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय गाठण्याच्या दिशेने खंबीरपणे चालत आहे. हे लक्ष्य २०१० मध्ये सेंट पीटसबर्ग परिषदेत निश्चित करण्यात आलेले आहे.
‘लोकमत’ शी बोलताना डॉ. एस. पी. यादव म्हणाले की, “ जगात वाघ जर कुठे सर्वात सुरक्षित असतील तर तो भारत देश आहे.” दिल्लीस्थित एनटीसीएचे डॉ. यादव सदस्य सचिव आहेत. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत वाघांचे संवर्धन करण्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यात नव्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांची भर पडली आहे. एनटीसीएच्या अर्थसंकल्पात अनेक पट (१९५ कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षात २५० कोटी रुपये) वाढ झाली आणि राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला सुरक्षितता उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात केंद्रीय देखरेख मंडळाला यश आले आहे.”
देशात सध्या सुमारे तीन हजार जंगली वाघ असून त्यांची शिकारही लक्षणीय संख्येत कमी करण्यात आली आहे. वाघांची शिकार १०० टक्के थांबली असा दावा मी करणार नाही. परंतु, राज्य वन विभाग, एनटीसीए, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अनेक उपायांनी वाघांचे बळी रोखण्यात यश मिळवले आहे, असे यादव ठामपणे म्हणाले.
व्याघ्र संरक्षणात आव्हाने कोणती, असे विचारल्यावर डॉ. यादव म्हणाले,“आमच्या देशात वाघांच्या वसतिस्थानांचे तुकडे तुकडे होणे आणि वाघांच्या वसतिस्थानातील खेड्यांना हलवणे ही मुख्य आव्हाने आहेत. असे असले तरी आम्ही तमिळनाडूत नुकतेच नवे व्याघ्र राखीव क्षेत्र निर्माण केले, असे ते म्हणाले. संरक्षणाखालील क्षेत्रात सुमारे ३,४०० चौरस किलोमीटरची (आता एकूण ७३,७६५.५७ चौरस किलोमीटर भाग) वाढ झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आयात करणारडॉ. यादव म्हणाले की, “वाघांसाठीची राखीव क्षेत्रांची व्यवस्था कशी करावी या शास्रात खूप वेगाने बदल होत आहेत आणि अनेक नव्या व्यवस्थापकीय आणि मूल्यमापनाच्या व्यवस्था व्यवहारात येत आहेत म्हणून भारतातील वाघांना आज उत्तम असे वसतिस्थान लाभले आहे. एनटीसीएनेही प्रथमच देशातील बिबट्यांची मोजणी केली असून हे प्राधिकरण दक्षिण आफ्रिकेतून आता चित्ता आयात करण्यात व्यस्त आहे.”