मागास, गरीब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देऊ - गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:30 AM2024-04-09T06:30:47+5:302024-04-09T06:31:07+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आश्वासन
सिवनी : आगामी लोकसभा निवडणुकांत विजयी होणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, आमचे केंद्रात सरकार आल्यानंतर अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय महिला तसेच गरीब वर्गातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी १ लाख रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यात मंडला लोकसभा मतदारसंघातील धानोरा येथे सोमवारी आयोजिलेल्या प्रचारसभेत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास आशा व अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करणार आहे. बेरोजगार युवकांना शिकाऊ उमेदवार म्हणून काम मिळवून देण्याची हमी काँग्रेसने दिली आहे. केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर भरतीची वादग्रस्त पद्धत आम्ही बंद करणार आहोत. तसेच सरकारी सेवेतील ३० लाख पदे भरली जातील. शेतकऱ्यांना किमान हमी भावाची योग्य रक्कम मिळावी यासाठी काँग्रेस केंद्रात सत्तेत आल्यास एक कायदा करणार आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकणे हा मोदींच्या गॅरंटीचा अर्थ : ममता बॅनर्जी
बांकुरा (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईची गॅरंटी म्हणजे निवडणुकीनंतर सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जाईल, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
त्यांच्या वैचारिक पूर्वजांनी ब्रिटिश, मुस्लीम लीगला पाठिंबा दिला होता
नवी दिल्ली : भाजपच्या वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश आणि मुस्लीम लीगला पाठिंबा दिला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर खरगे यांची ही प्रतिक्रिया आली.