कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील विद्यार्थी संघटनेच्या स्टुडेंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (SFI) नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला विरोध दर्शविला आहे. दौऱ्याआधीच नरेंद्र मोदींना दोन संघटनांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि येथील विविध रस्त्यांवर विरोध करण्याची योजना आखली आहे.
सोशल मीडियावर हॅशटॅग 'गोबॅकमोदी' असे एक अभियान सुद्धा सुरु आहे. ज्यामध्ये लोकांना विमानतळ आणि व्हिआयपी रोडवर नरेंद्र मोदींचा विरोध करण्यासाठी पोहोचण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यामुळे नरेंद्र मोदींचा मार्ग अडविला जाईल. यातच नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात पूर्णपणे सुरक्षा पुरवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विमानतळापासून शहरापर्यंत सर्व रस्ते खाली करण्यात आले आहेत. आंदोलन आणि कोणताही संशय टाळण्यासाठी रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांच्यासह नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा सतत विरोध करताना दिसत आहेत. यातच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या (दि.12) ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर दिसणार आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ विविध विद्यापीठांत होत असलेली हिंसक निदर्शने व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 13 जानेवारी रोजी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. मात्र, या आयोजिलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी बहिष्कार घालणार असल्याचे समजते. कामगार संघटनांनी गेल्या बुधवारी आयोजिलेल्या भारत बंददरम्यान पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी रेल, रास्ता रोको आंदोलन झाले. हिंसक घटनाही घडल्या. हे प्रकार बंदला समर्थन देणाऱ्या डावे पक्ष व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केले असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे. डावे पक्ष व काँग्रेसने घेतलेली दुतोंडीपणाची भूमिका आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या आयोजिलेल्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केले.
(सीएएविरोधातील निदर्शकांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रियंका गांधी)
(विरोधकांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी घालणार बहिष्कार)
(केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू)