१४ फेब्रुवारी हा वर्षातील सर्वात रोमॅन्टिक दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी प्रियजनांना शुभेच्छापत्रे, फुले किंवा चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त केले जाते, पण व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो आणि १४ फेब्रुवारीलाच का?, हे समजून घ्यायला हवं. ल्युपरसेलिया नावाने प्रसिद्ध असलेल्या तत्कालीन रोमन उत्सवातून ‘व्हॅलेंटाइन डे’चा उगम झाला. रोमन देवता फाउनसला समर्पित हा प्रजननाचा उत्सव दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाई. उत्सवात मुले डब्यातून मुलींच्या नावाची चिठ्ठी काढत आणि मग ते दोघं उत्सवात पार्टनर बनत. या जोड्यांचे नंतर अनेकदा विवाह होत. ख्रिश्चन धर्माच्या प्रारंभिक प्रसारावेळी हा उत्सव कायम राहिला, परंतु पाचव्या शतकाच्या अखेरीस पोप जेलास्यूस यांनी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘संत व्हॅलेंटाइन डे’ म्हणून घोषित केल्यानंतर ल्युपरसेलियावर बंदी आली. कॅन्टरबरी टेल्सचे लेखक जॉफरी चॉसर यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रेमाच्या दिनाचे स्वरूप दिल्याचं मानलं जातं. चॉसर यांनी इतिहासात काल्पनिक पात्रं घातली. ते लोकांना खरं वाटू लागलं. चॉसर यांच्या १३७५ मधील कवितेपूर्वी ‘व्हॅलेंटाइन डे’चा कुठेही संदर्भ नाही. ‘पार्लमेंट आॅफ फुल्स’ या कवितेत त्यांनी प्रेमाचा ‘सेंट व्हॅलेंटाइन’ यांच्या दिनाशी संबंध जोडला. या कवितेत १४ फेब्रुवारी रोजी पक्षी जीवनसाथी निवडण्यासाठी एकत्र येतात, असा उल्लेख आहे. त्यांनी कवितेत जे म्हटलं, त्याचीच ‘व्हॅलेंटाइन डे’च्या रूपाने परंपरा निर्माण झाली असावी.
सेंट व्हॅलेंटाइन कोण होते?‘व्हॅलेंटाइन डे’मागील प्रेरणा असलेले सेंट व्हॅलेंटाइन एकाहून अधिक व्यक्ती असल्याचे अनेकांना वाटते. रोमन कॅथॉलिक चर्चने संत म्हणून मान्यता दिलेले व्हॅलेंटाइन हे खरेखुरे व्यक्ती होते आणि इ.स. २७० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. व्हॅलेंटाइन हे पुजारी होते. ख्रिश्चन जोडप्यांना विवाहासाठी मदत केल्यामुळे सम्राट क्लाउडियस द्वितीय याने त्यांचा शिरच्छेद केल्याचा उल्लेख आहे. त्यांचा बिशप असाही उल्लेख आहे. सेंट व्हॅलेंटाइन यांच्याबाबत अनेक वाद असल्यामुळे त्यांचा आदर करणे थांबवले होते. ‘व्हॅलेंटाइन’ हा शब्द व्हॅलेन्टियस या लॅटीन शब्दापासून तयार झाला असून, व्हॅलेन्टियस म्हणजे योग्य आणि बलवान. सातव्या व आठव्या शतकात हे नाव प्रचंड लोकप्रिय होते. त्या काळातील डझनभर व्हॅलेंटाइन प्रसिद्ध असून, एक पोपही व्हॅलेंटाइन होते, पण जो ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा होतो, तो गुपचूप विवाह लावून देणाऱ्या रोमचे सेंट व्हॅलेंटाइन यांचा आहे. आजही ते प्रेमातील युगुलांचे आणि आनंदी विवाहांचे आश्रयदाते मानले जातात.आपण व्हॅलेंटाइन कार्ड का देतो?व्हॅलेंटाइन यांना तुरुंगात पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी ते ज्या मुलीवर प्रेम करीत, तिला पत्र पाठवून खाली फ्रॉम युवर व्हॅलेंटाइन, अशी स्वाक्षरी केली. व्हॅलेंटाइन यांनी पाठविलेले हे पत्र पहिले व्हॅलेंटाइन ग्रीटिंग मानले जाते. ‘व्हॅलेंटाइन डे’ १४ फेबु्रवारी रोजीच का़? सेंट व्हॅलेंटाइन यांना फेब्रुवारीच्या मध्यात मृत्युदंड देण्यात आला होता. त्यामुळे १४ फेब्रुवारीला हा दिवस पाळण्यात येतो, असे काहींचे म्हणणे आहे. रोमन उत्सव ल्युपरसेलियाचे ख्रिश्चिनीकरण करण्यासाठी ख्रिश्चन चर्चने १४ फेब्रुवारी रोजी सेंट व्हॅलेंटाइन पर्व ठेवले, असे काहींना वाटते. व्हॅलेंटाइनशी गुलाबाचा संबंध काय?१७ व्या शतकाच्या प्रारंभीपासून गुलाब फुलांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते. स्वीडनचे चार्ल्स द्वितीय यांनी युरोपमध्ये लँग्वेज आॅफ फ्लॉवर्स म्हणून ओळखली जाणारी पर्शियन काव्यात्म कला स्वीडनला आणल्यापासून गुलाब प्रेमाचे प्रतीक बनला आहे. रोमन लोकांची प्रेमाची देवता व्हिनसने गुलाबाला मनमोहक सुगंध अर्पण केल्याचे मानले जाते. ‘व्हॅलेंटाइन डे’ला एकमेकांना गुलाब देण्यामागे हे कारण असल्याचे मानले जाते.