Muslim Reservation, Pakistan: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav ) यांनी मुस्लीमआरक्षणाबाबत नुकतेच एक वक्तव्य केले. मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळालेच पाहिजे, असा म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा ( Himanta Biswa Sarma ) यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून लालू प्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल तर पाकिस्तानात जा आणि तेथे तुमची योजना राबवा, असा घणाघात सरमा यांनी लालूंच्या विधानाला प्रत्युत्तर देताना केला. तुमचे आरक्षण तिकडे जाऊन द्या. कारण भारतातला हिंदू समाज जागा झाला असून धर्माच्या आधारावर आरक्षण खपवून घेतले जाणार नाही, असेही सरमा म्हणाले.
"पंतप्रधान मोदींना संविधान आणि लोकशाही नष्ट करायची आहे. आता त्यांचा विचार जनतेलाही समजला आहे. पण मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळायलाच हवे," असे विधान लालू प्रसाद यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना सरमा म्हणाले, "धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा विचार आता चालणार नाही. भारतातील हिंदू समाज आता जागृत झाला आहे. हिंदूंना त्यांच्या अधिकाराची जाणीव आहे. त्यामुळे तुम्हाला जर मुस्लिमांना आरक्षण द्यायचे असेल तर तुम्ही तुम्ही ही योजना पाकिस्तानात जाऊ राबवा. भारतात धर्माच्या आधारावर दिले जाणारे आरक्षण खपवून घेतले जाणार नाही."
मुस्लिम आरक्षणाच्या या मुद्द्यावर भाजपा नेते गिरीराज सिंहदेखील बोलले. "राहुल गांधी आणि लालूप्रसाद मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत बोलतात. हे सर्वजण तुष्टीकरणाचे राजकारण करतात. नरेंद्र मोदी गरिबांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्यानंतर नरेंद्र मोदींनाही भविष्यात गरिबांचा मसिहा म्हटले जाईल," असे गिरिराज सिंह म्हणाले.