ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 23 - ब्रिटीश अल्पवयीन तरुणी स्कारलेट केलिंग बलात्कार आणि हत्या प्रकरणी तब्बल आठ वर्षानंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला असून दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. 2008 मध्ये गोव्यातील अंजुना बीचवर स्कारलेट केलिंगवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा मृतदेह तिथेच सापडला होता. पुराव्यांच्या अभावे आरोपींची सुटका करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर स्कारलेटच्या आईने आश्चर्य व्यक्त केलं असून आपण वरील न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे.
स्कारलेटची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला होता. पोस्टमार्टेम अहवालात मात्र मादक द्रव्यांचे अधिक सेवन केल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. गोवा सरकारने याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने एकमेव साक्षीदाराला इंग्लंडहून गोव्यात आणण्याचा पुर्ण प्रयत्न केला. तपासादरम्यान ब्रिटन नागरिक मायकल मॅनिअन यांनी आपण आरोपींना पाहिलं असल्याची साक्ष दिली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी न्यायालयासमोर येऊन पुरावा देण्यास नकार दिला.
मायकल मॅनिअन यांच्या साक्षीसाठी सीबीआयने 25 ऑक्टोबर 2015 मध्ये लंडनमधील भारतीय दुतावासाच्या मदतीने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगचीदेखील व्यवस्था केली होती. स्थानिक पोलिसांच्या तपासावरुन रोष व्यक्त झाल्यानंतर सरकारने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता.