राज्याचे माजी मुख्यमंत्री (Former CM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे भाजपनं गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा सोपवली आहे. भारतीय जनता पक्ष निश्चितच गोव्यात सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला.
"निश्चितच गोव्यात भाजप सरकार स्थापन करेल. आम्ही कोणतीही निवडणूक कमकूवत असल्याचं मानत नाही. परंतु आम्ही कोणासोबत लढणार आहोत हेच निश्चित होणं शिल्लक आहे. विरोधातले पक्षच आपापसात स्वत:ला मोठं म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा कोणासोबत लढायचंय हे निश्चित झाल्यावर पुढचं विश्लेषण करता येईल," असं फडणवीस एका प्रश्नचं उत्तर देताना म्हणाले.
"विरोधकांचा जोवर प्रश्न आहे, पवारांचा पक्ष असा आहे 'पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाए उसके जैसा'. ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी टीएमसीशी संवाद साधतात. तो राष्ट्रीय पक्ष नाही. त्यांचं राष्ट्रीय अस्थित्व नाही, राष्ट्रीय विचारही नाहीत, नाव राष्ट्रवादी असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष आहे," असं ते म्हणाले. फडणवीस यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत एनसीपी आणि शरद पवारांवर निशाणा साधला. "शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला ते दाखवणं गरजेचं आहे. ते थोड्या जागांवर लढण्यावर विचार जरी करत असले तरी त्याचा कोणताही फायदा होणार नाही," असं फडणवीस यांनी नमूद केलं.
'सोबत घेतील असं वाटत नाही'कोणताही पक्ष कोणासोबतही एकत्र येऊ शकतो. पण याबद्दल काही सांगता येणार नाही. परंतु आता जी परिस्थिती आहे, त्यावर त्यांना सोबत घेण्यासाठी कोणी तयार होईल असं वाटत नसल्याचंही ते म्हणाले.
ज्या आमदारांनी पक्ष सोडला त्यांना आपल्याला तिकिट मिळणार नाही हे माहित होतं. आम्ही त्यांना विश्वासात घेऊन जनता तुमच्या विरोधात आहे हे सांगितलं होतं. परंतु आजकाल राजकारणात कोणालाही थांबायचं नसतं. मायकल लोबो यांनी राजकाण भाजपकडून केलं. ते भाजपकडूनच मंत्री झाले, त्यांना सर्व पदं दिली. त्याची प्रमुख मागणी त्यांच्यासोबत पत्नीलाही तिकिट देण्याची होती. जे सातत्यानं निवडून येत आहेत त्यांना बाजूला सारून लोबो यांच्या पत्नीला तिकिट देण्यात यावं हे आम्हाला मान्य नव्हतं. ते भाजपत होते परंतु काँग्रेसच्या लोकांना ते मदत करत होते. यापूर्वीही निवडणुकीत त्यांनी मदत केली होती. त्यामुळे आम्ही त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.