पणजी: आज गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. गोव्याची राजधानी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतानसिओ मोन्सेरात (Atanasio Monserrate) यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचा अल्प मतांनी पराभव केला. पण, विजय मिळवल्यानंतरही मॉन्सेरात नाराज आहे. तसेच, त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना अनौपचारिकपणे पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
विजयी झाल्यानंतर एका पत्रकाराशी बोलताना मोन्सेरात म्हणाले की, 'मला वाटतं की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला पक्षात स्वीकारलेलं नाही. उत्पल पर्रीकरांना मिळालेल्या मतांवरुन असे दिसते की, आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पर्रीकरांना मतदान केले. या जागेवरुन काही मतभेद झाले, पण भाजप नेतृत्वाला डॅमेज कंट्रोल करता आले नाही.'
'पत्नीविरोधात काम केले'ते पुढे म्हणाले की, मी भाजपमधून बाहेर गेलेल्या उत्पल पर्रीकर आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. पण, आमच्या पक्षातील काही लोकांनी छुप्या पद्धतीने पर्रीकरांना मदत केली. इतकच काय, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझी पत्नी जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrate), हिच्याविरोधताती काम केले. जेनिफर यांनी तळेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली असून, यात त्यांचाही विजय झाला आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलाअतानसिओ मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर या आधी काँग्रेसमध्ये होत्या. गेल्या निवडणुकीत ते दोघेही काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण, 2019 मध्ये काँग्रेसमधील काही आमदार भाजपमध्ये सामील झाले. त्या 10 आमदारांच्या गटात हे दोघे पती-पत्नीदेखील होते. भाजपात आल्यानंतर पक्षाने दोघांना तिकीट दिले.