पणजी – देशातील ५ राज्यांच्या निवडणूक निकालाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा-काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. त्यानंतर आता भाजपाने बढत घेतली असून गोव्यात भाजपानं बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपाला २१ जागा, काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. टीएमसीही ५ जागांवर आघाडीवर आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. गोव्यात काँग्रेस-भाजपा यांच्यात प्रमुख लढत आहे. सुरुवातीच्या निकालात काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून आलं. गोव्यात सर्वात जुनी पार्टी महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीवर (MGP) सर्व राजकीय पक्षाचं लक्ष होतं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जर भाजपाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही मतांची गरज पडली तर आम्ही MGP सोबत आघाडी करू असं सांगितले होते.(Goa Election 2022)
गोव्यात भाजपाने देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना निवडणूक प्रभारी केले होते. देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी रणनीती आखली. तीच भाजपाच्या यशातून दिसून येत असल्याचं निकालातून दिसत आहे. गोव्यात मागील वेळी बहुमतापासून दूर राहिलेली भाजपानं यंदा बहुमत गाठल्याचं दिसून येत आहे. तर या निवडणुकीच्या निकालावर(Goa Election Result 2022) भाष्य करताना गिरीश महाजन म्हणाले की, गोव्यात भाजपाचं सरकार येणार आहे. त्यात कुठलंही दुमत नाही. संख्या कमी-अधिक होईल. पण गोव्यात भाजपाचं सरकार होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गोव्यात भाजपा- काँग्रेस सक्रीय
काँग्रेसच्या सूत्रांनुसार ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि डी. के. शिवकुमार यांच्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सुनील केदार व कर्नाटक काँग्रेसचे नेते गुंडू राव यांनाही गोव्यात तैनात करण्यात आले आहे. सुनील केदार यांना पाठविण्यामागे नेतृत्वाला वाटते की, महाराष्ट्राचे नेते जोडतोडीत कुशल आहेत. छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे वळविण्याचे काम ते सहज पार पाडू शकतील. निवडून आलेल्या आमदारांना गरज पडल्यास मुंबईत आणता यावे म्हणून महाराष्ट्राच्या इतर मंत्र्यांनाही निकालानंतर गोव्यात पाठविले जाऊ शकते. दुसरीकडे भाजपाचेही जोडतोडीचे प्रयत्न वेगात सुरू आहेत. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना ताबडतोब गोव्यात जाण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.