ऑनलाइन टीम
पणजी, दि. १७ - गोव्यात सध्या प्रचंड प्रमाणात कॅसिनो असून यामध्ये अनेक तरुणांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यात विशेष करुन २१ वर्षाखालील तरुणांचे प्रमाण वाढत आहे, म्हणून येथील गृहमंत्रालयाने येत्या आर्थिक वर्षात २१ वर्षाखालील तरुणांना कॅसिनोमध्ये जाण्यास बंदी घालण्याचा मसुदा तयार केला आहे.
गृहमंत्रालयाकडून एक मसुदा तयार करण्यात आला. यामध्ये अनेक नवीन नियम बनविण्यात आले असून कॅसिनोमध्ये २१ वर्षांखालील तरुणांना बंदी घालण्याचाही नियम आहे. सध्या हा मसुदा कायदा विभागाकडे परिक्षणासाठी पाठविला असून त्यांच्याकडून अभिप्राय मागितला आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याकडे आल्यावर त्यात काही बदल असतील तर ते करुन येत्या आर्थिक वर्षात हे नियम लागू करण्यात येईल, असे अतिरिक्त सचिव (गृह) संजीव गडकर यांनी सांगितले.
गोव्यात २०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात कॅसिनो २१ वर्षाखालील तरुणांना जाण्यास बंदी घालण्यात येईल असे सूचित केले होते.